मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाने(Mhada) यंदाही दिवाळीपूर्वी घरांची मोठी योजना आणण्याचं जाहीर केलं आहे. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यावर्षी जवळपास 5 हजार घरांची योजना निघणार आहे. याचसोबत आणखी एक गोड बातमी अशी की बीडीडी चाळ पुनर्विकासातल्या काही नव्या घरांच्या चाव्याही मे महिन्यात वाटल्या जाणार आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतले पुनर्वसनाच्या नागरिकांना देखील लवकरच आपलं घर मिळणार आहे. तसंच, यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे. येत्या वर्षभरात मुंबईसह संपूर्ण राज्यभरात एकूण 19,497 घरं बांधायचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यात फक्त मुंबईतच 5,199 घरं उभारली जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाही दिवाळीच्या आधी म्हाडाची मोठी योजना (Mhada Scheme) जाहीर होईल, अशी माहिती म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांनी दिली.(Mhada 5000 Homes Scheme Before Diwali).
म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हाडा, सिडको आणि इतर मंडळांच्या कामकाजाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हाडाच्या वतीने तब्बल 5 हजार घरांची योजना (Mhada housing scheme) आणण्यात येणार असल्याची घोषणा केली. याचबरोबर जयस्वाल यांनी असंही सांगितलं की, इतर मंडळांची मुंबईतील अनेक घरं रिक्त आहेत. “मी रुजू झालो तेव्हा साधारण 19 हजार घरं रिकामी होती, पण आता ही संख्या कमी होऊन 12 हजार 500 वर आली आहे. म्हणजेच, जवळपास 7 ते 7.5 हजार घरं विकली गेली आहेत. ते पुढे म्हणाले, “या घरांची विक्री वाढवण्यासाठी आम्ही सवलती देतोय, विविध योजना राबवतोय आणि रेंटल हाऊसिंगसाठी प्रस्तावही तयार करतोय. यामुळे उरलेली घरंही लवकर विकली जातील.” त्यांच्या म्हणण्यानुसार, येत्या एक ते दीड वर्षात ही रिकामी घरं 90 टक्क्यांपर्यंत विकली जातील, अशी ठोस योजना तयार करण्यात आली आहे.
मुंबईत 5199 घरांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद
म्हाडाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मोठं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या प्रादेशिक मंडळांकडून एकूण 19,497 एवढ्या नव्या सदनिकांचं बांधकाम करण्याचा मानस आहे. यासाठी म्हाडाने आपल्या अर्थसंकल्पात तब्बल 9202.76 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई मंडळाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर पुढील आर्थिक वर्षात इथे 5199 एवढ्या नव्या घरांचं बांधकाम प्रस्तावित असून यासाठी स्वतंत्रपणे 5749.49 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच कोकण मंडळाअंतर्गत 9902 एवढ्या सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
येथे वाचा – मुंबईत अवघ्या 12 लाखांत मिळणार घर; पण ‘ही’ अट कायम, पहा संपूर्ण माहिती..!