HSC SSC Result Date 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी निकाल 20 मे नंतर जाहीर झाला होता, मात्र यंदा 12 वीचा निकाल 10 मेच्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, दहावीचा निकालही 15 मेच्या आत लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दहावी-बारावीचा निकाल ‘या’ ॲपवर उपलब्ध होणार
राज्य मंडळाकडून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा 12 वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10 वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा बोर्डाने निकालाची डेडलाईन पाळण्याचा निर्धार केला आहे. सध्या 10 वी आणि 12 वीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून, निकाल वेळेत जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, या परीक्षांमध्ये सहभागी झालेल्या सुमारे 21 लाख विद्यार्थ्यांचे निकाल डिजिलॉकर अॅपवर(Digilocker app) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यंदा निकाल वेळेच्या आत जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली असून नेहमीपेक्षा लवकरच निकाल जाहीर होणार असल्याचं दिसतंय. यंदाच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 ते 15 दिवस आधी झाल्यामुळे, निकाल देखील विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा लवकर मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे निकालाबाबतचे ताण तणावाचे दिवस लवकर संपणार आहेत. अंदाजानुसार, 12 वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदा शिक्षक वर्गाने पेपर तपासणीवर कोणत्याही प्रकारचा बहिष्कार न घातल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण झाली आहे. त्यामुळे बोर्डाला निकालाची तयारी व्यवस्थित आणि वेळेत करता आली. देशात महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी तब्बल 87 टक्के एवढ्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यात आले आहे. यातील 60 ते 65 टक्के विद्यार्थ्यांचे हे आयडी मंडळाकडे आहे. विशेष म्हणजे, डिजिलॉकरवर उपलब्ध होणारे निकाल कायमस्वरूपी सुरक्षित असणार आहेत, जे भविष्य काळात विद्यार्थ्यांच्या कधीही उपयोगी पडणार आहेत.