मुंबई : आजच्या काळात मुंबई पुण्यात फक्त घर आहे म्हणून पुरेसं होत नाही. घराबरोबरच जर चांगल्या सुविधा मिळाल्या, तरच माणसाला खरं सुख मिळतं, नाही का? उदा. क्लब हाऊस, जिम, आणि स्विमिंग पूल यासारख्या सुविधा. अशा सुविधा असल्या की राहणं खूपच सोयीचं आणि मजेशीर होतं. जिममुळे आपलं फिटनेस चांगलं राहतं, स्विमिंग पूलमुळे मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मजा करता येते, आणि क्लब हाऊसमुळे सोसायटीतले लोक एकत्र येतात, गप्पा मारतात आणि कार्यक्रम घेतात. म्हणूनच आजकाल जिथे अशा सुविधा असतात, तिथे लोक घरं घ्यायला जास्त उत्सुक असतात. हे लक्षात घेऊन म्हाडाच्या एका मोठ्या गृह प्रकल्पात आता या सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. यामुळे रहिवाशांनाही एक छान, सुरक्षित आणि आरामदायक वातावरणात राहता येईल. हे लक्षात घेता आता म्हाडाच्या घरांना (Mhada Flats Mumbai) चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढणार आहे. (Swimming pool and clubhouse facility in Mhada project)..
म्हाडाच्या कोकण मंडळाने मोठ्या आशेने एक भला मोठा गृहप्रकल्प उभारला, पण तिथली शेकडो घरे अजूनही रिकामीच आहेत. विक्रीसाठी खूप प्रयत्न सुरू आहेत, पण म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळत नाहीये. म्हणून आता कोकण मंडळाने नवीन शक्कल लढवली आहे. या प्रकल्पात स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस उभारून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरूही केली गेली आहे. पुढील 10 दिवसांत ती अंतिम होईल अशी शक्यता आहे. आणि मग सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून जून महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन कोकण मंडळाकडून करण्यात आले आहे.
कोकण मंडळाचा विरार-बोळींजमधील हा प्रकल्प जवळपास 10 हजार घरांचा असून म्हाडाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. मात्र, दुर्दैवाने या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील दोन-तीन वर्षांपासून विक्रीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. कधी ही योजना, कधी ही सवलती, तरीही घरे विकली जात नाहीत. याच पार्श्वभूमीवर मंडळाने ‘बुक माय शो’सारखी संकल्पना उचलून ‘बुक माय होम’ ही योजना सुरू केली. ज्याला घर हवं, त्याने घर बुक करावं. पण तरीही अनेक घरे अजूनही रिकामीच आहेत आणि त्यामुळे मंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावं लागतोय.
हीच स्थिती बदलण्यासाठी आता एक नवा प्रयत्न सुरू झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रकल्पात जलतरण तलाव म्हणजेच स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी खास एक भूखंड राखीव ठेवण्यात आला होता आणि आता तिथेच या सुविधांची उभारणी होणार आहे. यामुळे या प्रकल्पातील घरांना चांगला प्रतिसाद मिळेल असं बोललं जात आहे.
येथे वाचा – संधी सोडू नका! जुलैमध्ये म्हाडाची 4 हजार घरांची लॉटरी; या महत्त्वाच्या लोकेशनवर 1173 घरे..!
सुमारे 10 हजार घरांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात केवळ घरच नव्हे, तर रहिवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि मनोरंजन देणाऱ्या सोयीसुविधाही असणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन कोकण मंडळाने आता प्रकल्पात स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे 1665 चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली असून या कामासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. सध्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून पुढील 10 दिवसांमध्ये ती अंतिम होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, पुण्यातील एका नामांकित बांधकाम कंपनीला हे काम मिळण्याची शक्यता आहे.
येथे वाचा – करोडोची संपत्ती असूनही लोक होम लोन का घेतात? पहा होम लोनचे 5 फायदे..!