Cidco Housing : सिडकोने “माझ्या पसंतीचे सिडकोचे घर” ही योजना काही काळापूर्वी जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तब्बल 26,000 घरांसाठी योजना आणण्यात आली होती. त्यात जवळपास 21,000 अर्जदारांना त्यांच्या पसंतीचं घर (Cidco Flat) मिळालं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण जेव्हा या घरांच्या किंमती समोर आल्या, तेव्हा अनेकांना जबरदस्त धक्का बसला. गरीबांसाठी असलेली ही घरे पाहता पाहता श्रीमंतांच्या आवाक्यातली झाली. परिणामी, अनेक लाभार्थ्यांनी घर घेण्याचा निर्णयच बदलला. अशा वेळी आता नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रकरणात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता सिडकोचे घर जिंकलेल्या अनेक लोकांमध्ये आशेचा किरण पुन्हा दिसायला लागला आहे. (Cidco House Prices may drop).
सिडको योजनेतून घर जिंकल्यानंतरही अनेक विजेत्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. कारण, घरांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होत्या, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या दरांमध्ये घट करावी, अशी मागणी जोर धरू लागली. ही मागणी उचलून धरत नवी मुंबईत आंदोलनही झालं. मनसेने पुढाकार घेत साखळी आंदोलन केलं आणि त्यानंतर ‘इंजेक्शन मोर्चा’सारखा अनोखा आंदोलनाचा प्रकारही राबवला. सिडको प्रशासनालाही यासंदर्भात निवेदन देण्यात आलं. पण सिडको प्रशासनाने “घरांच्या किंमती कमी करता येणार नाहीत” अशी आपली भूमिका स्पष्ट ठेवली. कारण या घरांची बांधणी उत्तम आहे आणि सर्व आवश्यक सुविधा दिल्या आहेत. सिडकोच्या या उत्तरामुळे निराश झालेल्या अनेकांनी अखेर आपली घरे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
या सगळ्या गोंधळात आता सिडकोची घरं (Cidco Houses) मिळालेल्या नागरिकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. त्यांनी त्यांच्या दरेगावच्या निवासस्थानी जाऊन शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी एकनाथ शिंदेंना निवेदन दिलं आणि घरांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्यात आणाव्यात, अशी विनंती केली. शिवाय, सध्याचे दर किती महाग आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबांच्या खिशाला किती भारी पडतात, हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
सिडको घरांच्या वाढलेल्या दरांच्या विरोधातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे, हे सिडको योजनेच्या विजेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, 26 हजार घरांच्या किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून सातत्याने आंदोलनं सुरू आहेत. पण सिडको प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं विजेत्यांचं म्हणणं आहे. शिंदेंसमोर झालेल्या चर्चेत त्यांनी वाढलेल्या घरांच्या दरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीही स्पष्टपणे मांडल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरांच्या किंमती तब्बल 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यातच कन्फर्मेशन अमाऊंट तातडीनं भरण्याची सक्ती करण्यात आली आहे, जी अनेकांसाठी परवडणारी नाही. त्यामुळे हे कन्फर्मेशन अमाऊंट रद्द करावं, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
शिंदेंचा एक फोन अन,,,
यावर त्वरित प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना थेट फोन केला. त्यांनी पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचे आदेश दिले आणि घरांच्या वाढीव दरांचा पुन्हा एकदा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, असे निर्देश देखील दिले आहेत. यासोबतच काही सिडको योजनेतील विजेत्यांनी थेट विजय सिंघल यांची भेट घ्यावी, अशा सूचनाही शिंदेंनी दिल्या आहेत. या घडामोडींमुळे सिडको घर विजेत्यांमध्ये थोडा दिलासा निर्माण झाला आहे. आता तरी घरांचे दर कमी होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, सिडकोची पुढील भूमिका काय असते, हे पाहणं आता सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.