3BHK Flats Mumbai : मुंबईत घर घेणं हे आज सर्वसामान्यांसाठी जवळपास अशक्यच झालं आहे. सतत वाढणाऱ्या घरांच्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबं आता ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, बदलापूर आणि पनवेल अशा आसपासच्या भागांकडे वळत आहेत. त्यातच मुंबईतील अनेक बांधकाम व्यावसायिक परिसराच्या सरासरी दरांपेक्षा खूप जास्त किंमत आकारताना दिसतात. त्यामुळे मुंबईकरांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मुंबईतील घरांच्या खऱ्या किमती काय आहे? तसेच चौरस फुटामागे कोणत्या भागात कोणते दर चालू आहेत? याठिकाणी आपण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील चौरस फुटानुसार किमती जाणून घेणार आहोत.
मुंबईत घरांच्या किंमतींचा विचार केला, तर दर चौरस फुटामागे साधारण 20 हजारांपासून ते तब्बल 3 लाख रुपयांपर्यंत या किमतीने घरं विकले जातात. त्यामुळे मुंबई शहर असो वा उपनगर, कुठेही 3 बीएचके फ्लॅट (3BHK Flat) खरेदी करायचा झाला तर खरेदीदाराला दीड कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागतो.
मुंबई–पुणे असो किंवा दुसरं कोणतंही शहर, त्याठिकाणी घरांच्या किंमती ठरवताना तिथला परिसर, घराचं वय, आसपासच्या सुविधा आणि तिथली वस्ती यांचा विचार केला जातो. हिंदुस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, दहिसर, बोरीवली ते घाटकोपरसारख्या उपनगरांमध्ये 3 बीएचके फ्लॅटसाठी (3BHK Flat) तब्बल 3 ते 7 कोटी रुपयांचे बजेट असणे आवश्यक आहे. पण जर नजर दक्षिण मुंबई, जुहू किंवा वांद्रे या भागांकडे वळवली, तर भागात किंमती थेट 10 ते 30 कोटींपर्यंत आहे. कारण इथले 3 बीएचके फ्लॅट्स फक्त राहण्यासाठी नसून, ते आलिशान जीवनशैली सुद्धा दाखवतात.
येथे वाचा – मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..
मुंबईत सर्वात स्वस्त 3 बीएचके याठिकाणी
मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करताना एकाच दरात सर्वत्र फ्लॅट मिळणं शक्य नाही. प्रत्येक परिसरानुसार घरांच्या किमती बदलतात. साधारणपणे मुंबई चार मोठ्या भागांत विभागली जाते. त्यात दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर (उत्तर मुंबई), पूर्व उपनगर (ईशान्य मुंबई) आणि मध्य मुंबई असे हे चार भाग आहे.
मुंबईच्या उपनगरांमध्ये ३ बीएचके फ्लॅट घेण्यासाठी तुलनेने परवडणारे पर्याय देखील उपलब्ध आहेत. दहिसर, मुलुंड, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, मालाड, बोरीवली, भांडूप, नाहूर, कांजूर मार्ग, वर्सोवा, खार, जोगेश्वरी, गोरेगाव आणि घाटकोपर या भागांमध्ये असे फ्लॅट्स साधारण 3 ते 7 कोटी रुपयांमध्ये मिळतात. या भागांतील घरांचे दर प्रति चौरस फूट 20,000 ते 70,000 रुपये इतके असतात. साधारणपणे याठिकाणी 3 बीएचके फ्लॅट्स 1000 ते 1,300 चौरस फूट या आकाराचे असतात.
येथे वाचा – मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..
मुंबईच्या उच्चभ्रू परिसरातील 3 बीएचके कितीला मिळतात?
मुंबईतील जुहू, वर्सोवा, अंधेरी, खार आणि वांद्रे हे सर्वाधिक मागणी असलेले आणि उच्चभ्रू परिसर मानले जातात. इथे 3 बीएचके फ्लॅट घेण्यासाठी खिशावर चांगलेच ओझे पडते. या भागांत घरांच्या किंमती साधारण 5 कोटींपासून थेट 13 कोटी रुपयांपर्यंत जातात. येथील घरांचे दर खूपच महाग श्रेणीत येतात. साधारणपणे प्रति चौरस फूट 40 हजार रुपये ते 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दराने फ्लॅट्स विकले जातात.
मध्य मुंबईतील 3 बीएचकेचे दर किती?
मध्य मुंबईतील दादर, लालबाग, माहिम, माटुंगा, लोअर परळ, प्रभादेवी, चिंचपोकळी, महालक्ष्मी आणि वरळी या भागांमध्ये घरांचे दर चांगलेच उंचावलेले आहेत. इथे फ्लॅट्स साधारण प्रति चौरस फूट 50 हजार रुपये ते 1.5 लाख रुपयांहून अधिक किंमतीत विकले जातात. यामुळे या भागात 3 बीएचके फ्लॅट (3BHK Flat Mumbai) खरेदी करण्यासाठी किमान 10 कोटी ते 20 कोटी रुपयांपर्यंत बजेट ठेवावं लागतं. विशेष म्हणजे, दादरमधील शिवाजी पार्क परिसरात तर 3 बीएचके घेण्यासाठी सुमारे 7 ते 12 कोटी रुपये खर्च येतो. या भागांतील बहुतेक 3 बीएचके फ्लॅट्सचे आकारमान 1,000 ते 1,300 चौरस फूट इतके असते.
दक्षिण मुंबई – सर्वात महागडा हाऊसिंग झोन
मुंबईत आलिशान घरांच्या (Luxury Flats) किंमतींचा विचार केला, तर दक्षिण मुंबई सर्वांत महागडी ठरते. ताडदेव, कुलाबा, कफ परेड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्ससारख्या भागातील जुन्या इमारतींमध्ये अजूनही नवीन प्रोजेक्टच्या तुलनेने कमी किमतीत 3 बीएचके मिळू शकतो, म्हणजेच साधारण 10 कोटी रुपयांपर्यंत.
परंतु, जर तुम्ही याच भागातील नवीन प्रोजेक्ट किंवा टॉवरमध्ये घर खरेदी करायचं ठरवलं, तर खर्च थेट 15 कोटींपेक्षा जास्त होतो.
मलबार हिल, पेडर रोड, नेपियन्सी रोड आणि अल्टमाउंट रोडसारख्या प्राईम भागामध्ये परिस्थिती आणखी वेगळी आहे. येथे घरांचे दर साधारण प्रति चौरस फूट 1 ते 2 लाख रुपये एवढे आहे. त्यामुळे या भागात 1,200 ते 1,500 चौरस फूट आकारमान असलेलं 3 बीएचके घर घेण्यासाठी तब्बल 15 ते 30 कोटी रुपये मोजावे लागतात. ही आकडेवारी नाइट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीच्या अहवालावर आधारित असून, ती हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.