सध्याच्या काळात मुंबईत घर घेणे सर्वसामान्य माणसासाठी परवडणारे राहिलेले नाही. घरांच्या किमती प्रचंड वाढल्यामूळे, अगदी उपनगरातसुद्धा वन बीएचके घरासाठी(1BHK Flat) 80 ते 90 लाख रुपये मोजावे लागतात. मात्र अशा परिस्थितीत मुंबईतील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. यासाठीच्या अटींमध्येही आता काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती..
12 लाखात घर कोणाला मिळणार?
मुंबई महानगरपालिकेच्या(BMC) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अवघ्या 12 लाखांत मुंबईत घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेने(BMC) कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी माहुल परिसरात बांधलेली घरे विक्रीसाठी खुली केली आहेत. मात्र अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने, प्रशासनाने घर विक्रीच्या अटींमध्ये काही बदल केले असून आता नव्या नियमांनुसार, श्रेणी 1 मधील कर्मचाऱ्यांखेरीज सर्व श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी या घरांसाठी अर्ज करू शकतील. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीखही वाढवून 15 मे करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बांधलेले काही घरे महापालिकेला दिले आहेत, ज्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार होते. माहुलच्या आंबापाडा भागात असलेल्या एव्हर स्माईल, एस.जी. केमिकल आणि व्हिडीओकॉन अतिथी या ठिकाणी एकूण 13 हजार सदनिका तयार केल्या होत्या. पण पुनर्वसनानंतर देखील तिथे अनेक घरे रिकामीच राहिली आहेत, कारण उर्वरित प्रकल्पबाधित रहिवासी त्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नसल्याने आता महापालिकेने या रिक्त घरांसाठी जाहिरात दिली आहे. आणि यानंतर आता तृतीय श्रेणीतील 220 कामगारांनी घरासाठी अर्ज देखील केले आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून आता म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांना प्रथमच लॉटरीच्या माध्यमातून स्वतःचं घर मिळवण्याची संधी देण्यात येत आहे. माहुलमधील नव्या इमारती संकुलात महापालिकेने शाळा, रुग्णालय आणि इतर सोयीसुविधाही उभारल्या आहेत. या परिसरात 225 चौरस फूट क्षेत्रफळाच्या सुमारे 4700 घरे बांधण्यात आली आहेत, ज्यांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही सर्व घरे लॉटरीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहेत.
अन्यथा घर सोडावे लागेल
नव्या नियम व अटींनुसार, ज्यांना माहुलमधील सदनिकेचा लाभ मिळेल आणि जे सध्या पालिकेच्या सेवा निवासस्थानात राहतात, त्यांना नव्या घराचा ताबा घेतल्यानंतर सेवा निवासस्थान सोडावं लागेल. या सदनिका मुख्यतः चतुर्थ श्रेणीतील कामगारांसाठी उपलब्ध असणार आहेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सुरुवातीला 15 मार्च होती, मात्र आता ही मुदत वाढवून 15 मे करण्यात आली आहे.