खुशखबर! पुणे-पिंपरीत म्हाडाची 4,500 घरांची सोडत; अर्ज कधी सुरू होणार?

Mhada lottery Pune 2025 : म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत पुढील पंधरा दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये तब्बल 4,500 घरांची सोडत जाहीर होणार आहे. यासोबतच चाकण आणि नेरे परिसरात नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याचेही नियोजन केले आहे, अशी माहिती पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे येतात. या सर्व भागांमध्ये सामान्य नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडामार्फत सातत्याने केले जात आहे. अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी पिंपरी-चिंचवडला आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंडळाकडून वेगवेगळ्या भागात सर्वसामान्य लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये 3 वेळा घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा, येत्या दोन आठवड्यांत जवळपास साडेचार हजार घरांची सोडत जाहीर होणार आहे.

संत तुकारामनगरमधील जुन्या गाळ्यांचा पुनर्विकास सुरू

म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील यांनी सांगितले की, म्हाडाकडून स्वतंत्र प्रकल्प उभारण्याबरोबरच खाजगी विकसकांच्या माध्यमातूनही गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत. या प्रक्रियेत म्हाडाची भूमिका महत्त्वाची आहे. संत तुकारामनगर येथे जवळपास 1 हजार जुन्या गाळ्यांचा पुनर्विकास सुरू झाला आहे. येथील गाळेधारकांनी एकत्र येऊन खाजगी विकासकांच्या मदतीने प्रकल्प राबवू शकतात. त्या प्रकल्पासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचे काम म्हाडामार्फत केले जात आहे.

येथे वाचा – मुंबईत स्वस्तात 3BHK फ्लॅट याठिकाणी मिळतात..

चाकण आणि नेरे परिसरात म्हाडाचे नवे प्रकल्प (Mhada Housing Project)

शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने वेगवेगळ्या भागांमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याला प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडामार्फत चाकण आणि पिंपरी-चिंचवडलगतच्या नेरे परिसरात नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील यांनी दिली.

येथे वाचा – मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..

Leave a Comment