अरे वा! म्हाडाचे 52 लाखाचे घर आता फक्त 36 लाखात; नेमकी कुठे आहेत ही घरे?

Mhada Flats Mumbai : आजच्या प्रचंड महागाईच्या काळात स्वतःचं घर घेणं म्हणजे सर्वसामान्यांना जवळजवळ अशक्य वाटतं. किंमती दिवसेंदिवस वाढू लागल्याने अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अधुरेच राहत आहे. पण आता अशा परिस्थितीत एक आनंदाची बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण म्हाडाच्या घरांच्या किमती जवळपास अर्ध्यावर आल्या आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 52 लाख किंमत असलेली म्हाडाची घरे (Mhada Flats) आता फक्त 36 लाखांत मिळणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात किंमत कमी झाल्याने घर घेणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. ही घरे नेमकी कुठे आहेत? आणि ही घरे कोणाला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा..

काही काळापूर्वी 31 लाख रुपये किंमतीत घर मिळालेल्या विजेत्यांना यावर्षी तेच घर तब्बल 52 लाख रुपये मोजून घ्यावे लागणार होते. या मोठ्या वाढीव किंमतीला विजेत्यांनी विरोध केला. अखेर 156 विजेत्यांच्या भूमिकेनंतर म्हाडाने आपला निर्णय बदलत वाढवलेल्या किंमतीतून माघार घेतली आहे. ही घरे चितळसर मानपाडा येथील असून त्यासाठी सुरुवातीला म्हाडाच्या कोकण मंडळाने 2000 साली सोडत काढली होती.

येथे वाचा – खुशखबर! पुणे-पिंपरीत म्हाडाची 4,500 घरांची सोडत; अर्ज कधी सुरू होणार?

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2000 साली चितळसर, मानपाडा याठिकाणी भूखंड विक्रीसाठी सोडत काढण्यात आली होती. त्या वेळी साधारण तीन लाख रुपयांत हे भूखंड मिळणार होते. या सोडतीत तब्बल 600 लोक विजेते ठरले होते. या भूखंडांचे क्षेत्रफळ 35 ते 75 चौरस मीटर इतके होते. मात्र, नंतर हे भूखंड वनविभागाच्या मालकीच्या जमिनीवर असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयीन वाद सुरू झाला आणि अखेर योजना रद्द करण्यात आली. यामुळे 181 विजेत्यांकडून भरण्यात आलेली 10 हजार रुपये एवढी अनामत रक्कम म्हाडाकडेच राहिली.

काळाच्या ओघात म्हाडाने या भूखंडांवर विकासक नेमले आणि तिथे इमारत उभारली. त्यानंतर 2018 आणि 2021 मध्ये विजेत्यांना घरे घेण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. म्हाडाच्या या घरांची किंमत 2021 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक घराची किंमत 31 लाख 47 हजार 988 रुपये ठरवण्यात आली होती, तसेच घरांचे क्षेत्रफळ कमी करून 31.77 चौरस मीटर करण्यात आले होते. मात्र यावर्षी जुलैमध्ये कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत विजेत्यांना धक्का देणारी माहिती मिळाली. घरांची किंमत अचानक 31 लाखावरून 52 लाखांपर्यंत वाढवण्यात आली होती. याबाबतची माहिती दै. पुढारीने 17 जुलै 2025 च्या अंकात दिली होती.

येथे वाचा – मुंबईत लॉटरीशिवाय घ्या म्हाडाचे घर… पण कोणत्या लोकेशनवर? येथे लगेच जाणून घ्या..

वाढीव किंमत देऊन घरे घेण्यास विजेत्यांनी स्पष्ट नकार दिला आणि आपला विरोध कायम ठेवला. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर म्हाडाला माघार घ्यावी लागली. गुरुवारी सोडत विजेत्यांनी म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेतली आणि त्यानंतर किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 52 लाख रुपये किंमतीची घरे आता फक्त 36 लाखांत उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचा लाभ एकूण 156 विजेत्यांना मिळणार आहे.

Leave a Comment