Home Loan: स्वतःचं एक घर असावं, ही प्रत्येक माणसाची मोठी आणि आयुष्यभर जपलेली इच्छा असते. मात्र आजच्या युगात स्वतःचं घर घेणं हि गोष्ट अजिबात सोपी राहिलेली नाही. महागाई फारच वाढली आहे, आणि घरांचे दरही गगनाला भिडले असल्याचं चित्र आहे. त्यामुळे गृहकर्जाशिवाय घर घेणं हे जवळपास अनेकांसाठी अशक्यच आहे. पण कर्ज घेणं म्हणजे फक्त अर्ज करून पैसे घेणं नाही, तर त्यामागे तुमचा आर्थिक पाया किती मजबूत आहे, याची जाणीव असणं सुद्धा आवश्यक आहे. विशेषतः तुमचा पगार किती आहे, त्यावरच ठरतं की तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल आणि त्यासाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल.
जर तुम्ही ९ टक्के व्याजदरावर आणि २० वर्षांच्या कालावधीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किमान किती पगार असणे आवश्यक आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर जर तुम्हाला १० लाख रुपयांचं कर्ज हवं असेल, तर त्यासाठी मासिक EMI सुमारे ८,९९७ रुपये येतो आणि त्यासाठी तुमचा पगार कमीत कमी २२,५०० रुपये असणे आवश्यक आहे.
अरे देवा! घर तुमचं पण निर्णय ‘म्हाडा’चा? बघा काय आहे म्हाडाचं नवं धोरण!
अशाच प्रकारे जर तुम्ही २० लाखांचं कर्ज घेणार असाल, तर EMI जवळपास १७,९९४ रुपये येतो आणि पगार किमान ४५,५०० रुपये हवाच. पगार जसजसा वाढतो, तसतसं तुम्ही ३०, ४०, ५० लाखांचं कर्ज घेऊ शकता. उदा. ३० लाखासाठी सुमारे ६७,५०० रुपये, ४० लाखांसाठी ९०,००० रुपये आणि ५० लाखांसाठी किमान १,१२,५०० रुपये इतका पगार असणे अपेक्षित आहे.
तुमचा पगार जर १.३५ लाखाच्या आसपास असेल, तर तुम्ही ६० लाखांचं कर्ज सहज घेऊ शकणार आहेत. ७० लाखांसाठी १.५७ लाख, ८० लाखांसाठी १.८० लाख, आणि ९० लाखांचं गृहकर्ज हवं असल्यास सुमारे २.०२ लाख रुपये मासिक उत्पन्न असणं आवश्यक आहे. जर तुम्ही थेट १ कोटी रुपयांचं गृहकर्ज घ्यायचा विचार करत असाल, तर सुमारे ८९,९७० रुपयांचा EMI येतो, आणि त्यासाठी किमान २.२५ लाख रुपये इतका पगार असणं गरजेचं आहे.
या सगळ्यामागे बँकांचं एक साधं गणित असतं ते म्हणजे, तुमचा मासिक हप्ता म्हणजेच EMI, तुमच्या पगाराच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. म्हणजेच जर तुमचा पगार ५०,००० रुपये असेल, तर त्यातला फक्त २०,००० रुपये इतका भाग EMI साठी वापरणं बँकांना योग्य वाटतं. हे नियम बँकेद्वारे तुमचं आर्थिक स्थैर्य जपण्यासाठी लावले जातात, जेणेकरून तुम्हाला दर महिन्याला EMI भरताना अडचणी येणार नाहीत.
तर मंडळी, घर घ्यायचं असेल, तर केवळ स्वप्न बघणं पुरेसं नाही, तर त्या स्वप्नाला खरं करण्यासाठी आवश्यक ती तयारीही केली पाहिजे. तुम्ही आज जिथे उभे आहात, तिथून पुढे तुम्हाला किती पगार असणं आवश्यक आहे? किंवा किती वेळात तुम्ही त्या स्तरावर पोहोचू शकता? हे ठरवून आजपासूनच नियोजन करा आणि वर आम्ही सांगितलेलं EMI चं साधं गणित तुम्हाला योग्य ते नियोजन करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.