आजच्या काळात महागाईने अक्षरशः कंबर तोडली आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये घर (Flat) खरेदी करणं जरी अवघड असलं, तरी सध्या त्याहून मोठं आव्हान म्हणजे मुलांचं संगोपन करणं हे आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा खर्च डोकं वर काढणारा ठरतो. मुलांचं संगोपन म्हणजे फक्त माया-ममता किंवा वारसा इतकंच नसून, तो एक मोठा आर्थिक निर्णय असतो. हा निर्णय तुमच्या भविष्यातील अनेक गोष्टींवर परिणाम करतो. तुम्ही आयुष्यात घर घेऊ शकाल का, आणि ठरलेल्या वेळेत निवृत्त होऊ शकाल का, हे सुद्धा यावर अवलंबून असतं.
1995 च्या काळात कुटुंब चालवताना एक मूल वाढवणं आणि घर खरेदी करणं दोन्ही शक्य होतं. मात्र
2025 मध्ये ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तुम्हाला या दोन्हीपैकी फक्त एकच गोष्ट निवडावी लागते, अशी अनेकांची स्थिती आहे. महागाईने इतकी झळ बसवली आहे की मुलांचं संगोपन आणि घर घेणं, हे दोन्ही एकत्र करणं मध्यमवर्गीयांसाठी जवळजवळ अशक्य झालं आहे. पूर्वी ज्या गोष्टी सहज शक्य होत्या, त्या आज आयुष्यभराचं आव्हान बनल्या आहेत. अशी माहिती लिंकडीनवर अनुभवी व्यक्तीकडून पोस्ट करण्यात आली आहे.
येथे वाचा – तयारीला लागा! सिडकोची महा लॉटरी लवकरच, सरकार देणार कमी किमतीत घर..!
एक मुल वाढवण्यासाठी तब्बल एवढा खर्च
भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर आज एक कटू वास्तव उभं आहे, ते म्हणजे शहरांमध्ये एका मुलाच्या संगोपनावर सरासरी तब्बल 45 लाख रुपये एवढा खर्च होतो. हा आकडा लक्षात घेतला तर एवढ्या पैशांत एखाद्या छोट्या शहरात चांगलं घर घेता येऊ शकतं. इतकंच नव्हे तर, हा खर्च अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जवळजवळ दहा वर्षांच्या पगाराइतकाच आहे. म्हणजेच, सध्याच्या काळात मुलांचं संगोपन ही केवळ भावनिक जबाबदारी नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा महत्त्वाचा आर्थिक निर्णयही आहे.
खर्चाचं गणित पाहून धक्का बसेल
मुलांच्या संगोपनाचा खर्च किती मोठा आहे, हे थोडं तपशीलवार पाहूया. मुलाच्या जन्मापासून ते 17 वर्षांच्या वयापर्यंत केवळ शाळेच्या फीवरच सुमारे 17 लाख रुपये खर्च होतो आणि यात कॉलेजचं शिक्षण धरलेलंच नाही.
आज शहरांतील खासगी शाळांची फी दरवर्षी तब्बल 2 ते 4 लाखांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या शहरांमध्ये डे-केअरचा खर्चही दरमहा 20 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. त्यात भर म्हणजे वैद्यकीय खर्च दरवर्षी सरासरी 14% ने वाढत चालला आहे. शालेय शिक्षणाशिवाय इतर उपक्रमांचा खर्च वेगळाच. जसे की ऑलिंपियाड असो, डान्स क्लास असो किंवा क्रिकेट कोचिंग असो, अशा प्रत्येक उपक्रमासाठी कुटुंबांना दरवर्षी 25 हजार ते 50 हजार रुपये मोजावे लागतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मुलाचं संगोपन म्हणजे केवळ शिक्षणाचाच खर्च नाही; तर त्यामागे सतत वाढणाऱ्या असंख्य जबाबदाऱ्या दडलेल्या आहेत.
येथे वाचा – या 3 स्मार्ट ट्रिक्समूळे होम लोन लवकर संपून वाचतील लाखो रुपये, एकदा पहाच..!
भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मुलांचं संगोपन ही केवळ जबाबदारी नसून एक प्रचंड आर्थिक आव्हान ठरत आहे. एका मुलाच्या संगोपनावर सरासरी कुटुंबाच्या उत्पन्नातील तब्बल 57% हिस्सा खर्च होतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. तुम्हाला वाटतं की मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी तुम्ही पुरेसं करून ठेवलं आहे, तर हा गैरसमज दूर करा. कारण समोर लग्नाचा खर्च येतो. आजच्या काळात लग्नासाठी लाखो रुपये लागतात, आणि वर्षागणिक हा खर्च झपाट्याने वाढतच आहे.