Mumbai : मुंबईकरांनो, तुम्ही आपल्या कुटुंबाच्या स्वप्नातलं घर घ्यायची तयारी करताय? तेही नवीन गृहनिर्माण प्रकल्पातून फ्लॅट बुक (Flat Booking) करायचा विचार सुरू आहे? पण जरा थांबा… तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, या प्रकल्पांच्या जाहिराती कशा गोड गोड आणि आकर्षक वाटतात म्हणजेच मस्त मस्त सुविधा, छान घरं, स्विमिंग पूल, गार्डन, जिम (Gym), सगळं एकदम परफेक्ट! हे सगळं बघून असं वाटतं की बस्, आता इथेच राहायचं! पण कधी कधी जे जाहिरातीत दाखवलं जातं, ते मात्र प्रत्यक्षात मिळतच नाही आणि मग कुठेतरी आपली फसवणूक झालीये हे लक्षात येतं. त्यामुळे तुमची किंवा तुमच्या मित्राची अशी फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. आकर्षक आणि गोड वाटणाऱ्या गृहप्रकल्पाच्या जाहिरातीत तुम्ही असं काय बघायला पाहिजे, जे अनेक लोक बघत नाही. आज ही बातमी वाचल्यानंतर तुमचे डोळेच उघडतील, फक्त त्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.
गृहप्रकल्पातील घरे पटापट विकली जावी यासाठी बिल्डर गृहप्रकल्पाच्या आकर्षक जाहिराती छापतात. त्यामुळे अनेकांना जाहिरातीत दाखवलेल्या घरांची भुरळ पडते. त्यानंतर सामान्य ग्राहक त्या संबंधित गृहप्रकल्पात घर घेण्याचा निर्णय घेतात. पण असा निर्णय घेण्यापूर्वी ग्राहकाने काही गोष्टी नीट तपासल्या पाहिजे. नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो. कारण जाहिरातीतलं “लक्झरी स्वप्न” फक्त कागदावरच राहून जातं. मग फ्लॅट बुक केल्यावर लक्षात येतं, की ना तसं गार्डन आहे, ना ती सुविधा! मग? फसवणूक झाल्यासारखं वाटतं, हो ना? अशा प्रकारांना आळा घालण्यासाठीच आता महारेराने कंबर कसली आहे. महारेराने आता काही नवे नियम आणले आहेत, ज्यामुळे घर घेताना तुम्हाला काय बघायचंय, हे नीट समजेल.
महारेराचचा हा नवीन नियम: तुमच्या फायद्याचा!
महारेराने नुकतेच काही नियम आणलेत, ज्यामुळे तुम्ही घर घेताना डोळसपणे निर्णय घेऊ शकाल. आता प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत मग ती वर्तमानपत्रात असो, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सअपवर की रस्त्यावरच्या होर्डिंगवर, काही गोष्टी सक्तीच्या केल्या आहेत. कोणत्या गोष्टी? तर पहा: (1) महारेरा नोंदणी क्रमांक: हा क्रमांक म्हणजे त्या प्रकल्पाची ओळखपत्रासारखा आहे. तो बघितल्यावर तुम्हाला कळेल, हा प्रकल्प खरंच नोंदणीकृत आहे की नाही. (2) महारेरा वेबसाइट: यावर तुम्हाला प्रकल्पाची सगळी माहिती मिळेल, कायदेशीर कागदपत्रांपासून ते प्रकल्पाच्या प्रगतीपर्यंत. (3) क्यूआर कोड: हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर एका क्लिकवर तुम्हाला त्या प्रकल्पाची खरीखुरी माहिती मिळून जाईल, जसे की खरंच कोणत्या सुविधा आहेत, प्रकल्प कधी पर्यंत पूर्ण होणार, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं जाहिरातीत कसं दिसायला हवं? बारीक अक्षरात लपवून नाही, तर जाहिरातीमधील सगळ्यात मोठ्या अक्षरांइतकं ठळक, रंगीत आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात अगदी डोळ्यांत भरणारं असायला हवं. महारेराने याबद्दल परिपत्रक काढले आहे आणि हा नियम आत्तापासूनच लागू झालाय.
हे इतकं महत्त्वाचं का आहे? हे पहा
आता तुम्ही म्हणाल, “अरे, जाहिरातीत एवढं काय तपासायचं?” पण जरा विचार करा, घर घेणं म्हणजे आयुष्यातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे, बरोबर ना? तुम्ही आयुष्यभर केलेली कमाई त्यात ओतताय. मग त्या बदल्यात तुम्हाला खरं काय मिळतंय, हे माहीत हवं की नको? काही बिल्डर्स जाहिरातीत “सगळं आहे” असं सांगतात, पण प्रत्यक्षात फ्लॅट बघायला गेल्यावर काही वेगळीच गोष्ट दिसून येते. क्यूआर कोडचा खरा फायदा हाच, की तुम्हाला एका क्लिकवर प्रकल्पाची खरी खुरी माहिती मिळते. पण काही बिल्डर्स यातही मोठी हुशारी करतात आणि क्यूआर कोड इतका बारीक किंवा खराब टाकतात, की तो स्कॅनच होत नाही! पण आता महारेरा त्यांच्यावर नजर ठेवून असणार आहे.
नियमाचे पालन न केल्यास बिल्डरांना मिळणार हा दंड
महारेरा आता कोणालाच मोकळीक देणार नाही. जर एखाद्या बिल्डरने हे नियम पाळले नाहीत. म्हणजे नोंदणी क्रमांक, वेबसाइट किंवा क्यूआर कोड नीट टाकला नाही. तर त्यांना ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाईल. आणि तरीही १० दिवसांत त्यांनी सुधारणा केली नाही, तर “सातत्याने नियम मोडणे” म्हणून आणखी कडक कारवाई त्यांच्यावर होईल. विशेष म्हणजे क्यूआर कोड जर नीट स्कॅन होत नसेल, तर बिल्डर्स लोकांची खैर नाही. कारण तुम्हाला पारदर्शक माहिती मिळावी, असा त्या मागचा उद्देश आहे.
तुम्ही काय केलं पाहिजे?
आता तुम्ही म्हणाल, “मग आम्ही काय केलं पाहिजे?” अगदी सोपं आहे! पुढच्या वेळी कोणत्याही नवीन प्रकल्पाची जाहिरात बघितली की मग ती व्हाट्सअपवर असो, फेसबुकवर की रस्त्यावरच्या कुठल्याही बॅनरवर, खालील काही महत्त्वाच्या गोष्टी तपासा:
(1) जाहिरातीत महारेरा नोंदणी क्रमांक आहे का?
(2) जाहिरातीत महारेरा वेबसाइटचा उल्लेख आहे का?
(3) क्यूआर कोड आहे का? आणि तो स्कॅन होतो का? (मोबाईल काढा आणि तिथेच चेक करा) आणि हो, या गोष्टी जाहिरातीत ठळक आणि स्पष्ट दिसतायत का? जर या गोष्टी नीट दिसत नसतील, तर जरा सावध व्हा. थेट त्या संबंधित बिल्डरकडे जा आणि स्पष्ट विचारा, “महारेरा नोंदणी दाखवा” किंवा महारेरा वेबसाइटवर जा आणि त्या प्रकल्पाची माहिती पूर्णपणे तपासून घ्या. तुम्ही मेहनतीने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करताय, मग थोडी काळजी घ्यायला काय हरकत आहे? जर आम्ही दिलेली माहिती खरंच महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्याकडील सर्व ग्रुपला आमच्या बातमीची ही लिंक पाठवा. जेणेकरून भविष्यात कोणाचीही फसवणूक होणार नाही.